पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता नवे आरोप समोर आले आहेत. केतन यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जुळवून देणाऱ्या मित्तल कुटुंबीयांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोहगडावर झालेल्या हत्येप्रकरणी केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, या हत्येमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा संशय विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. मित्तल कुटुंबीयांनी सिया गोयलबाबत चुकीची माहिती देऊन तिची प्रतिमा वेगळी दाखवत लग्न ठरवले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या कुटुंबाचीही सखोल चौकशी करून त्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच सिया गोयलच्या पालकांच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित करत त्यांच्या भूमिकेत विरोधाभास असल्याचा आरोप केला. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केली असून, पोलिसांकडून हत्येच्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.




