दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी सकाळीच मोठी घडामोड घडली. दिल्ली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करत वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून थेट सफदरजंग रुग्णालयात हलवले. साध्या वेशातील काही पोलीस डॉक्टर असल्याचे सांगून आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पडद्याआड जाऊन वांगचुक यांना बाहेर आणण्यात आले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कारवाईनंतर जंतरमंतरवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलनाची सूत्रे हाती घेत आपण आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली. मात्र, काही वेळातच त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर एका युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दीपके यांनी आंदोलनात काही बाहेरील व्यक्तींना पैसे देऊन पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला. सोनम वांगचुक 28 जूनपासून नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळत आहे. मात्र, पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवल्याने या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. आता वांगचुक यांच्या अनुपस्थितीत अभिजीत दीपके आंदोलन पुढे कसे नेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




