Amit Thackeray : तब्येत ढासळली; सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकरांनंतर आता अमित ठाकरे घेणार भेट

spot_img

वांगचूक यांचे वजन ८ ते ९ किलोने घटले; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर अमित ठाकरे दिल्लीला रवाना होणार

नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला आता २० दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या या अन्नत्यागामुळे वांगचूक यांची प्रकृती चिंताजनक बनली असून त्यांचे वजन तब्बल ८ ते ९ किलोने कमी झाले आहे. त्यांच्यासोबत क्रॉकोच जनता पार्टीचे अभिजित दीपके हेदेखील आंदोलनात सहभागी आहेत. वांगचूक यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे देशभरातून चिंता व्यक्त होत असतानाच, आता या आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक स्तरातून मिळणारा पाठिंबा कमालीचा वाढला आहे.

याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे उद्या सकाळी दिल्लीत जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे इतरही काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला होता, तसेच २० दिवस उलटूनही आंदोलनकर्त्यांची साधी भेट न घेणाऱ्या भाजप सरकारवर “सत्तेचा माज” आल्याची घणाघाती टीका केली होती. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता अमित ठाकरे स्वतः जंतरमंतरवर जाऊन वांगचूक यांची भेट घेणार असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर ‘असंवेदनशील’ असल्याचा गंभीर आरोप केला. एवढे दिवस एकही सरकारी प्रतिनिधी वांगचूक यांना भेटायला न आल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही कालच वांगचूक यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. एकीकडे नेत्यांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात असली, तरी मागण्यांवर ठाम असलेल्या वांगचूक यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरचा दबाव सातत्याने वाढत चालला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ