मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कोचिंग संस्था महेश ट्युटोरियल्सची 33 शाखा अचानक बंद करण्यात आल्या आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे सुमारे 2,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घडामोडींची सुरुवात मुलुंड येथील शाखा बंद झाल्यानंतर झाल्याचे सांगितले जात आहे.
संस्थेने पालकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये प्रवेशित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नसून त्यांचा अभ्यासक्रम नियमितपणे सुरू राहील, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
1988 मध्ये सुरू झालेली महेश ट्युटोरियल्स ही मुंबई आणि महाराष्ट्रातील नामांकित कोचिंग संस्थांपैकी एक होती. मात्र, संस्थेची मूळ कंपनी एमटी एज्युकेअर मागील काही काळापासून आर्थिक संकटात सापडली आहे. डिसेंबर 2022 पासून कंपनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) अंतर्गत दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरी जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेवर कोट्यवधी रुपयांचे थकीत कर्ज असून आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे शाखा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर येत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या ऑडिटमध्येही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या अचानक निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी असून भरलेले शुल्क, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन आणि भविष्यातील अभ्यासक्रमाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही सामाजिक संस्थांनी या प्रकरणाची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच, खासगी कोचिंग संस्थांच्या कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रणाची गरज पुन्हा चर्चेत आली आहे.
एकेकाळी महेश ट्युटोरियल्सच्या राज्यभरात सुमारे 60 आणि मुंबईत जवळपास 40 शाखा कार्यरत होत्या. आता अचानक बंद झालेल्या केंद्रांनंतर हजारो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष सरकार तसेच संस्थेच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.




