पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला पॅसेंजर ट्रेनने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा अपघात बहरमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडला. सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी खासगी व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमतिता-काटोया पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचा पूर्णपणे चुराडा झाला आणि ती रुळांपासून दूर फेकली गेली. अपघाताच्या वेळी व्हॅनमध्ये चालकासह आठ जण होते. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगवरील एका बाजूचे फाटक बंद होते, मात्र दुसऱ्या बाजूचे फाटक उघडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेळेत फाटक बंद न केल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये दुःखाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.




