महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये अर्थखात्याच्या वाटपावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगत, हा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की, महायुतीमध्ये अशा प्रकारचे मतभेद योग्य नाहीत. युती स्थापन करताना ज्या तत्त्वांवर सहमती झाली होती, त्यानुसारच खातेवाटप व्हावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्याच्या चर्चांचा उल्लेख करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाला नकार दिल्याने पुढील घडामोडींवर भाष्य करणे सध्या शक्य नसल्याचेही ते म्हणाले.
पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीबाबत बोलताना, ईश्वरपूर नगरपालिकेतील नगराध्यक्षांच्या अपात्रतेशी संबंधित विषयासाठी ही भेट झाल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. त्यापलीकडील राजकीय चर्चांबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीला त्यांनी नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सांगत, पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असल्याचा दावा केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुश्रीफ यांनी पावसाच्या परिस्थितीवर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. 20 तारखेपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यास दुबार पेरणीची गरज भासणार नाही, मात्र अशी वेळ आल्यास जिल्हा नियोजन निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.




