मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्म प्रा. लि. वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई करत संस्थेचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. मरीन लाइन्स, प्रिन्सेस स्ट्रीट, कालबादेवी परिसरातील या शतकभर जुन्या डेअरीची 14 जुलै 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. या तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित काही गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा FDAकडून करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम 2011 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले. या अहवालाच्या आधारे परिमंडळ-1 चे पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी 15 जुलै 2026 रोजी परवाना निलंबित करण्याचा आदेश जारी केला.
1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईच्या खाद्यसंस्कृतीतील एक जुने आणि विश्वासार्ह नाव मानले जाते. मात्र, स्वच्छतेच्या नियमांबाबत झालेल्या कथित त्रुटींमुळे या प्रतिष्ठित संस्थेला प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वीही FDAने मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्यावर स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती.




