रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली झोपलेल्या मातेचा मोबाईलही चोरट्याने लांबवला; तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना
घरातून बाहेर पडताना किती सतर्क राहावे लागते, याचा एक धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आला आहे. गुजरात येथील दादरा नगर हवेली येथे राहणारी रोशनी साहू ही महिला आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन मैत्रिणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आली होती. मात्र, कल्याणला पोहोचल्यावर मैत्रिणीशी संपर्क होऊ शकला नाही. रात्र झाल्यामुळे आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने तिने रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली रात्र काढण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास रोशनीचा डोळा लागल्याची संधी साधत एका अज्ञात चोरट्याने तिच्या कुशीत झोपलेल्या ६ महिन्यांच्या आर्यनचे अपहरण केले आणि सोबतच तिचा मोबाईल फोनही चोरून नेला.
मंगळवारी पहाटे जेव्हा रोशनीला जाग आली, तेव्हा बाळ आणि मोबाईल दोन्ही गायब असल्याचे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या मातेने केलेल्या आक्रोशानंतर स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ मदत केली आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू असून, चिमुकल्या आर्यनचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास केला जात आहे.




