झारखंडमधील थरारक घटना: सख्ख्या दाजीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेहुणीने रचला कट; होणाऱ्या पतीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला
पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाची शाई अद्याप वाळलेली नसतानाच, देशात प्रेमसंबंधातून घडलेले आणखी एक अत्यंत भयानक कांड उघडकीस आले आहे. झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या सख्ख्या दाजीच्या प्रेमापोटी, लग्नाला अवघे तीन दिवस उरले असताना आपल्या होणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी मेहुणी आणि तिच्या दाजीला अटक केली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
भिखोडीह गावातील २१ वर्षीय नीरज हाजरा हा तरुण ५ जुलै रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला होता. मुलाचा पत्ता न लागल्याने घाबरलेल्या वडिलांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सुरुवातीला संशयावरून कुटुंबीयांनी नीरजचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली.
गिरीडीहचे पोलीस अधीक्षक डॉ. विमल कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ एक विशेष तपास पथक (SIT) तैनात केले. पोलिसांनी नीरजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि शेवटचे लोकेशन ट्रॅक केले. हा माग काढत पोलीस बिहारच्या जमुई जिल्ह्यातील बेला जंगलात पोहोचले. तिथे काही दिवसांपूर्वीच एक अज्ञात मृतदेह सापडला होता, जो तपासाअंती नीरज हाजराचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि या बेपत्ता प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. गमतरिया गावातील उर्मिला कुमारी हिचे तिच्याच बहिणीचा पती (दाजी) सुभाष पासवान याच्याशी गेल्या अनेक महिन्यांपासून सूत जुळले होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दरम्यानच्या काळात, उर्मिलाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न नीरज हाजरासोबत निश्चित केले.
लग्नाची सर्व तयारी झाली होती आणि अक्षता पडायला अवघे ३ दिवस उरले होते. मात्र, उर्मिलाला नीरजसोबत संसार थाटायचा नव्हता आणि दाजीसोबतचे नातेही तोडायचे नव्हते. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नीरजला कायमचे वाटेतून हटवण्याचा क्रूर कट या दोघांनी रचला.
ठरलेल्या कटानुसार, उर्मिला आणि सुभाषने नीरजला गाठून त्याची गळा आवळून हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह शेजारच्या बिहार राज्यातील जंगलात नेऊन फेकून दिला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासापुढे या खुनी प्रियकरांचे काही चालले नाही. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून जेलची हवा दाखवली आहे.




