राज्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्नभेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या नावाखाली सुरू असलेल्या गंभीर गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पैठण येथील बागरिया अॅग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स या दोन ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर छापेमारी केली. तपासादरम्यान अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. वापरलेले टिन पुन्हा वापरणे, यंत्रसामग्रीवर धूळ आणि गंज साचलेला असणे, दुर्गंधीयुक्त तेलाचे साठे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव, तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा नसणे तसेच प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणे अशा अनेक गंभीर त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. या कारवाईत पाम, सोयाबीन, कपाशी तसेच इतर वनस्पती तेलासह एकूण २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.
पुढील तपासासाठी तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे मराठवाड्यात बनावट दूध विक्रीलाही मोठा आळा बसला असून, दूध संकलनात सुमारे एक लाख लिटरची घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी विभागाची ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.




