मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी, अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी आपल्या प्रकृतीबाबत एक भावनिक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मेधा यांना कर्करोगाचे निदान झाले असून त्यांच्यावर सध्या किमोथेरपी उपचार सुरू आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत उपचारांच्या महत्त्वाच्या टप्प्याची यशस्वी पूर्तता झाल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये उपचारांमुळे त्यांनी आपले केस कापल्याचेही दिसून येत असून, आजाराशी खंबीरपणे लढण्याचा त्यांचा निर्धार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेधा यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्यांच्या दोन्ही लेकी सई मांजरेकर आणि गौरी इंगवले यांनीही आईसाठी भावनिक संदेश शेअर केले आहेत. सईने आईचा उपचारानंतरचा फोटो पोस्ट करत, “Strongest Ever… आई, मला तुझा खूप अभिमान आहे,” असे लिहिले. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, “आमच्या आयुष्यात कायम प्रकाश पसरवल्याबद्दल धन्यवाद, तुझ्यावर खूप प्रेम करते,” अशा भावना व्यक्त केल्या. गौरी इंगवले हिनेही आईसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले. या भावनिक पोस्ट्समुळे सोशल मीडियावर सहानुभूती आणि सकारात्मक संदेशांचा वर्षाव होत असून, मेधा मांजरेकर यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून केली जात आहे.
Breaking News




