Bhutam Bhayam Jathai Look : दररोज ७ तास मेकअप आणि गूढ भाषा! ‘भूतम भयम्’ मधील खतरनाक ‘जठाई’चा अंगावर काटा आणणारा लूक व्हायरल; ओळखा कोण आहे ही अभिनेत्री?

spot_img

‘ऑरेंज ज्यूस गँग’च्या हॉरर-कॉमेडी चित्रपटात ‘जठाई’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री छाया कदम यांनी घेतलेली मेहनत पाहून प्रेक्षकांचे डोळे पांढरे; २४ जुलैला चित्रपट रिलीज.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘हॉरर कॉमेडी’ जॉनरला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. अशातच ‘तुंबाडची मंजुळा’च्या यशानंतर आता आणखी एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच ‘भूतम भयम्’ (Bhutam Bhayam) या बहुचर्चित चित्रपटाचा थरारक आणि विनोदी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या टीझरपेक्षाही सध्या चित्रपटातील एका अत्यंत भीतीदायक आणि रहस्यमय पात्राच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अंगावर काटा आणणारा चेहरा, तीक्ष्ण भेदक नजर, लांबलचक जटा आणि पडक्या वाड्याच्या पार्श्वभूमीवर चेटकिणीसारखी बसलेली ही ‘जठाई’ नक्की आहे कोण? या प्रश्नाने प्रेक्षकांना चक्रावून सोडले होते. अखेर या गूढ पात्रामागचा चेहरा समोर आला असून, ही भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री छाया कदम साकारत आहेत.

‘जठाई’ या पात्राचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर छाया कदम यांच्या लूकची सर्वत्र वाहवा होत आहे. या आव्हानात्मक भूमिकेविषयी बोलताना छाया कदम म्हणाल्या, “कलाकार म्हणून मला नेहमीच काहीतरी वेगळे आणि प्रवाहाविरुद्ध करण्याचे वेध लागलेले असतात. ‘भूतम भयम्’ मधील ‘जठाई’ ही माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात कठीण आणि वेगळी भूमिका आहे. तिचे बोलणे, चालणे आणि हसणे यावर मला प्रचंड काम करावे लागले. विशेष म्हणजे, ही जठाई चित्रपटात ‘गिब्रिश’ (Gibberish) म्हणजेच एक वेगळीच गूढ भाषा बोलते, जी आत्मसात करणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते.”

या भूमिकेसाठी घ्याव्या लागणाऱ्या शारीरिक कष्टांबद्दल सांगताना त्यांनी एका थक्क करणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, “या भयावह लूकसाठी मला दररोज तब्बल साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा आणि शूटिंग संपल्यावर तो काढण्यासाठीही तेवढाच वेळ लागायचा. इतकी जड वेशभूषा आणि मेकअप करून वावरताना माझ्या हालचालींवर खूप मर्यादा यायच्या. मात्र, दिग्दर्शक आणि टीमच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. हा अनुभव थकवणारा असला, तरी एक कलाकार म्हणून मला यामुळे प्रचंड समाधान मिळाले.”

या चित्रपटाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सोशल मीडिया गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ म्हणजेच करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव आणि सिद्धांत सरफरे यांच्यासोबत मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डिजिटल विश्वातील या ताकदीच्या चेहऱ्यांमुळे आणि छाया कदम यांच्या ‘जठाई’ रूपामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. रहस्य, भीती आणि खमंग विनोदाची मेजवानी असलेला ‘भूतम भयम्’ येत्या २४ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ