छोट्या पडद्यावरील ‘आरंभी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या परिचयात आलेले ज्युनिअर कलाकार संजीब सिंह यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार, शूटिंग संपल्यानंतर घरी परतत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी साकीनाका येथील स्टुडिओमध्ये मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ते दुचाकीवरून घरी निघाले होते. वाटेत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. तातडीने वैद्यकीय मदत मिळूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कोलकाता येथील रहिवासी असलेल्या संजीब सिंह यांनी सुमारे ३० वर्षे मनोरंजन क्षेत्रात ज्युनिअर कलाकार म्हणून काम केले होते. त्यांचे लग्न झाले नव्हते. त्यांच्या पश्चात भाऊ आणि बहीण असा परिवार असून ते कोलकात्यात वास्तव्यास आहेत. संजीब यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कोलकात्याकडे पाठवण्यात आले. दरम्यान, FWICE संस्थेने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातही दिला आहे.




