Missing Link : मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प पुन्हा चर्चेत; दरड कोसळल्यानंतर खर्च आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

spot_img

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर मुसळधार पावसानंतर दरड कोसळल्याच्या घटनेने राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेसह त्याच्या वाढत्या खर्चावरून सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुमारे १३.३ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी जवळपास ७,१८१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, प्रति किलोमीटर खर्च अंदाजे ५४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ३,२१५ कोटी रुपये होता. त्यानंतर २०१५ आणि २०१७ मध्ये सुधारित मंजुरी मिळाल्यानंतर खर्चात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. २०१८ मध्ये सुधारित अंदाजानुसार खर्च आणखी वाढला आणि नंतर विविध कारणांमुळे अंतिम प्रकल्प खर्च ७ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला.

खोपोली ते कुसगावदरम्यान उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये आठ पदरी मार्ग, दोन बोगदे आणि दोन उंच पूल (व्हायाडक्ट) यांचा समावेश आहे. मात्र, प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या काही काळातच पावसामुळे दरड कोसळल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामाची गुणवत्ता, नियोजन आणि देखभाल याबाबत सार्वजनिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून या घटनेची कारणमीमांसा केली जात असून, आवश्यक तांत्रिक तपासणीनंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ