कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा मंजूर केला आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च २०२४ रोजी केलेल्या विनंतीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. नव्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मंगळुरू एक्सप्रेस (१२१३३/१२१३४), तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (१२४३१/१२४३२) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नॉर्थ (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/१२२०२) या गाड्या सावंतवाडी रोड स्थानकावर थांबणार आहेत.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, तसेच पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने सहकार्य मिळत असल्याचे नमूद केले.




