सैराट चित्रपटातून ओळख मिळवलेले अभिनेता अरबाज शेख यांनी त्यांच्या वडिलांच्या उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाविषयी सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटल चर्चेत आले आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत संबंधित यंत्रणांकडे लक्ष वेधले होते. या आरोपांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने रुग्णालयाची तपासणी केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या पथकाने रुग्णालय परिसरातील फातिमा फार्मसीची पाहणी केली असता अनेक गंभीर नियमभंग आणि त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यानंतर संबंधित मेडिकलमधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच रुग्णांना रुग्णालयातील विशिष्ट फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशारा FDAने दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
Breaking News




