Aaditya Thackeray : “राम मंदिराला लुटणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावणार का?” शरद पवारांच्या ‘NDA’ प्रवेशाच्या वावड्यांवर आदित्य ठाकरेंचा घणाघात!

spot_img

मविआमध्ये अस्वस्थता? पक्षांतराची भाषा करणाऱ्या आमदारांना आणि खासदारांना आदित्य ठाकरेंचा थेट सवाल; जनतेचा रोष महत्त्वाचा असल्याचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षांतराचे नाट्य दिवसेंदिवस अधिकच रंजक आणि गुंतागुंतीचे होत चालले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ६ खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीची वाट धरल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील ‘एनडीए’त (NDA) सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या संभाव्य राजकीय भूकंपावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दांत आक्षेप घेत, भाजपसोबत जाऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना सडेतोड सवाल केले आहेत.

शरद पवारांच्या पक्षाच्या कथित ‘एनडीए’ प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अत्यंत तटस्थपणे उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “पवारांचा पक्ष कुठे जाणार, हा आमचा विषय नसून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही आमची तत्त्वे आणि भूमिका नेहमीच स्पष्ट ठेवली आहे. सध्या राज्यातील जनता महागाई, वीज समस्या आणि तीव्र पाणीटंचाईमुळे होरपळत असून, सरकारविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त करत आहे. आमचे लक्ष या जनतेच्या प्रश्नांकैडे आहे.”

पक्षांतराची तयारी करणाऱ्या सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींना धारेवर धरत आदित्य ठाकरेंनी थेट राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले “आज जे कोणी आमदार, खासदार किंवा नगरसेवक अधिकृत अथवा अनधिकृतपणे भाजपच्या गोटात सामील होऊ पाहत आहेत, त्यांना माझा एकच रोकडा सवाल आहे. ज्यांनी प्रभू श्री राम मंदिराला लुटले, देवाच्या दानपेटीवरही डल्ला मारला, अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणार का? सध्या जंतर-मंतरवर सोनम वांगचूक आणि अभिजीत देशाच्या हितासाठी आंदोलन करत आहेत; तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन भाजपला साथ देणार का?”

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि भाजपच्या काही बड्या नेत्यांमध्ये गुप्त गाठीभेटी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. हालांकि, दोन्ही बाजूंकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि भाजपविरोधातील धार आगामी काळात अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ