मुंबईतील सर्व बांधकामे तातडीने बंद करा’; मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर मनसे प्रमुखांचा महायुती सरकारवर घणाघात
नुकत्याच उद्घाटन झालेल्या ऐतिहासिक ‘पुणे-मुंबई मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सुमारे १०० टन मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने हा मार्ग तब्बल १९ तास ठप्प झाला होता. या दुर्घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “राज्याची बदनामी खपवून घेणार नाही” या मुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरेंनी, “तथाकथित विकास कामांमुळेच महाराष्ट्राची खरी बदनामी होत आहे,” अशा शब्दांत टोला लगावला.
राज ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या अनियंत्रित सिमेंटच्या जंगलावर चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना मुंबईतील सर्वच नवीन बांधकामे (कन्स्ट्रक्शन) तातडीने बंद करण्याची मागणी केली. “केवळ फ्लायओव्हर आणि पूल बांधणे म्हणजे विकास नाही,” असे म्हणत त्यांनी परदेशातील सुटसुटीत शहरांचे उदाहरण दिले. केवळ ६०-६५ दिवसांपूर्वी १ मे रोजी उद्घाटन झालेला आणि ‘जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान’ वापरल्याचा दावा केला गेलेला टनेल पहिल्याच पावसात गळू लागल्याने, या प्रकल्पाच्या दर्जावर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनीच्या संशोधनाचा केवळ गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात भारतीय कंत्राटदारांनी केलेल्या सुमार कामामुळेच ही वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करताना राज ठाकरेंनी मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या विधानाचा दाखला दिला. ते म्हणाले, “आता ‘मेरा जूता है जपानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी’ अशी अवस्था झाली आहे. नवीन कंत्राटदारांना ५६ टक्के कमिशन द्यावे लागते, मग जनतेला असेच खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते मिळणार.”
आपल्या भाषणात त्यांनी ब्रिटीश कालीन आणि पाश्चिमात्य वास्तुकलेचे दाखले देत आजच्या ‘व्हिजन’ नसलेल्या प्रशासनाला आरसा दाखवला. १८०० च्या दशकात बांधलेले व्हिटी स्टेशन (CST) आजही कोट्यवधींच्या लोकसंख्येला पुरून उरते आहे, तर १९३३ मध्ये अमेरिकेत अवघ्या १४ महिन्यांत बांधलेली ११० मजली ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ विमानाची धडक आणि बॉम्बस्फोट होऊनही आजही ताठ मानेने उभी आहे. ब्रिटीश आजही त्यांच्या पुलांची १०० वर्षांची गॅरंटी संपल्याची पत्रे भारताला पाठवतात, याकडे लक्ष वेधत राज ठाकरेंनी आजच्या सत्ताधाऱ्यांना भविष्याचा विचार करून दर्जेदार कामे करण्याचा सल्ला दिला.




