Sanjay Gaikwad : ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवर संजय गायकवाड यांचे स्पष्टीकरण

spot_img

राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता कथित ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांनी वेग घेतला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे केलेले कौतुक, तसेच दोन्ही नेत्यांच्या कथित भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या चर्चांवर आता शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत सर्व अफवांना फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या घडामोडींमध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. त्यांच्या मते, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे केवळ विरोधी पक्षातील नेतेच नव्हे, तर विविध पक्षांचे आमदारही कौतुक करत आहेत.

गायकवाड यांनी सांगितले की, महसूल विभागात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सातबारा नोंदींसह अनेक प्रलंबित विषयांवर काम झाल्यामुळे त्यांच्या कार्याची सर्व स्तरातून दखल घेतली जात आहे. त्यामुळे या कौतुकाचा संबंध कोणत्याही राजकीय समीकरणाशी जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शरद पवार सक्रिय असताना अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता त्यांना वाटत नाही.

दरम्यान, या चर्चांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असली तरी, कथित भेटी किंवा संभाव्य राजकीय हालचालींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चांकडे सध्या केवळ राजकीय तर्क-वितर्क म्हणूनच पाहिले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ