Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप; अयोध्या राम मंदिर कथित घोटाळ्यावरून आंदोलन

spot_img

नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली चिंता आता काहीशी मिटली आहे. या भागात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र तो धोका आता पूर्णपणे टळला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघरमध्ये धुमाकूळ घालणारा पावसाचा तीव्र ‘भोवरा’ (Low-Pressure Cyclone System) मंगळवारी नाशिकच्या दिशेने सरकणार होता. परंतु, या प्रणालीने अचानक आपली दिशा बदलल्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावरील ढगफुटीचे मोठे संकट टळले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

एकिकडे पावसाचे संकट टळले असले, तरी नाशिकमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर येथील भाविकांच्या दानाची कथित लूट झाल्याच्या प्रकरणावरून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराबाहेर काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी ‘चौकीदार चोर है, देश लुटला आता रामाचे दान ही लुटले’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले. सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा हा देवाचा आणि जनतेचा सत्याग्रह यशस्वी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटी होणार असल्याची भीती आणि अफवा जाणीवपूर्वक पसरवली.

“देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुलतान आहेत. त्यांना बळीराजाच्या किंवा शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी काहीही देणेघेणे नाही. केवळ आमचे आंदोलन चिरडण्यासाठी त्यांनी हा भीतीचा फुगवटा तयार केला होता,” असा थेट आरोप सपकाळ यांनी केला.

अयोध्या मंदिर न्यासातील कथित सोन्या-चांदीच्या आणि रोख रकमेच्या चोरीचा मुद्दा उचलून धरत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते:

“चोरीचा आरोप असलेल्या चंपत राय यांच्या घरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बुलडोझर चालवणार का? जर हाच गुन्हा एखाद्या मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक व्यक्तीने केला असता, तर लगेच कारवाई झाली असती,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कथित चोरीच्या तपासासाठी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) त्यांनी अविश्वास दाखवला. या एसआयटीमध्ये मोदींचेच हस्तक आणि ‘बदमाश’ भरलेले आहेत, असा आरोप करत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. मंदिराच्या विश्वस्त मंडळात चोरांना का स्थान दिले आहे? भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेला हा पवित्र पैसा राजकीय पक्षांची ‘फोडाफोडी’ करण्यासाठी वापरला जात आहे, हे देशाचे दुर्दैव आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

माहिती अधिकाराचा भंग करून स्वतःच्या बगलबच्चांना मंदिरात बसवून डल्ला मारला गेल्याचा आरोप करत, काँग्रेस या प्रकरणी ९ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ