केरळमधील वायनाड जिल्ह्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे सावट गडद झाले आहे. मेप्पाडीजवळील कल्लाडी परिसरात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असले, तरी सात जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर भूस्खलनाची तीव्रता स्पष्ट झाली असून त्याची सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू आहे.
प्राथमिक तपासात कल्लाडी बोगदा प्रकल्पाच्या कामादरम्यान खोदकामातून साचलेला मोठ्या प्रमाणातील मलबा अचानक घसरल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत वायनाडमध्ये तब्बल २६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर शोध व बचावकार्य राबवत आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचीही तपासणी केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन डोंगर उतार आणि संवेदनशील भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे वायनाडसह आसपासच्या भागात सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.




