Mumbai : ‘AL JAFZIA’ जहाजावर भारतीय तटरक्षक दलाची नजर !

spot_img

मुंबईच्या मनोरी किनाऱ्यालगत गेल्या दोन दिवसांपासून तेलाने भरलेले एक मालवाहू जहाज समुद्रात अडकून पडल्याने प्रशासन आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोराई-मानोरी परिसरातील किनाऱ्याजवळ वाहत आलेले हे जहाज सध्या भारतीय तटरक्षक दलाच्या देखरेखीखाली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ‘AL JAFZIA’ नावाचे हे जहाज मुसळधार पाऊस, उंच लाटा आणि प्रतिकूल समुद्री हवामानामुळे आपल्या नियोजित मार्गावरून भरकटत किनाऱ्याच्या दिशेने आले. जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा असल्याने कोणतीही दुर्घटना किंवा तेलगळती झाल्यास सागरी पर्यावरणासह स्थानिक मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिकांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका पत्करलेला नसून तातडीने सुरक्षेची उपाययोजना सुरू केली आहे. सध्या जहाजातून तेलाची गळती झाल्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याने दिलासादायक परिस्थिती आहे, मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन तटरक्षक दलाने जहाजाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

तांत्रिक पथक जहाजाची स्थिती, स्थैर्य आणि त्यातील मालाची तपासणी करत असून ते सुरक्षितपणे किनाऱ्यावरून हटवण्याच्या पर्यायांवर काम सुरू आहे. या घटनेची अधिकृत नोंद येलो गेट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तटरक्षक दल, पोलीस आणि संबंधित सागरी यंत्रणा परस्पर समन्वयाने पुढील कारवाई करत आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. तरीही जहाजातील तेलामुळे उद्भवू शकणाऱ्या पर्यावरणीय धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ