२४ जुलै रोजी होणार मतदान आणि निकाल; बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचे पारडे जड
देशाच्या काही भागात मान्सूनचा जोर सुरू असतानाच, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय उष्णता कमालीची वाढली आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकतेच आपल्या खासदारकीचे राजीनामे दिल्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. या जागा भरण्यासाठी आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. या तिन्ही जागांचा मूळ कार्यकाळ अनुक्रमे २०२९ आणि २०३० सालापर्यंत होता, मात्र खासदारांच्या अकाली राजीनाम्यामुळे येथे मध्यवधी निवडणूक घ्यावी लागत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या जागांसाठी ७ जुलै ते १४ जुलै २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर १७ जुलै ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. यानंतर २४ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन तात्काळ निकाल घोषित केला जाईल. विशेष म्हणजे, पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने एक कडक नियम जारी केला आहे; त्यानुसार प्रत्येक आमदाराला बॅलेट पेपरवर आपली पसंती दर्शवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला ‘जांभळ्या रंगाचा स्केच पेन’ वापरणेच बंधनकारक असेल. कोणताही इतर पेन वापरल्यास मत अवैध ठरवले जाईल. राज्यसभेच्या नियमांनुसार, सभागृहातील प्रत्येक रिक्त जागा ही स्वतंत्र मानली जाते, त्यामुळे या तिन्ही जागांसाठी निवडणूक आयोग वेगवेगळी अधिसूचना जारी करत आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील बदललेले राजकीय चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, भाजपने त्यांना सत्तेवरून खाली खेचत बंगालमध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. सत्ता बदलानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, तृणमूल काँग्रेसचे जवळपास ५८ आमदार आणि काही खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या फुटीर नेत्यांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला असल्याने, विधानसभेतील संख्याबळ पाहता या तिन्ही राज्यसभेच्या जागांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




