Nashik : नाशिकमध्ये पावसाचा वाढता कहर; शाळांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी बंद

spot_img

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा प्रभाव आता नाशिक जिल्ह्यातही तीव्रतेने जाणवू लागला असून, अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबई–नाशिक महामार्गालगतचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेला आहे, तर शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकमधील के. पी. कॉलेज परिसरालाही पाण्याचा वेढा पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून, प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाव्य धोका लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक ग्रामीण या पाच तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, या भागांमधील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा विचार करून प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय शेतात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि सप्तशृंगी मंदिर उद्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिकमधील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवली असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ