Lonavala Rain : लोणावळ्यात पर्यटकांसाठी कडक निर्बंध; धबधबे, धोकादायक पॉईंट आणि सेल्फीवर प्रशासनाची बंदी

spot_img

मुंबई, पुणे आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः लोणावळा आणि मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाढत्या पावसामुळे धबधबे, घाट परिसर आणि डोंगराळ भागांमध्ये अपघातांचा धोका लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत विशेष निर्बंध लागू केले आहेत. हे आदेश 6 जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून, 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचा अर्थ पर्यटनावर पूर्ण बंदी असा नसून, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कालावधीत पर्यटकांना धोकादायक धबधबे, खोल दऱ्या, कडे आणि संवेदनशील पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, व्हिडिओ शूट करणे किंवा सोशल मीडियासाठी रिल्स तयार करणेही प्रतिबंधित करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करणारी एकवीरा देवी मंदिर परिसर, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग किल्ला यांसारखी पर्यटनस्थळे सध्या प्रशासनाच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे या भागांमध्ये घसरून पडणे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे आणि इतर दुर्घटनांचा धोका वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे. तसेच, लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ