Supriya Sule : राज्यातील पावसाच्या आपत्तीवर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; ‘तातडीने आणीबाणी जाहीर करा’

spot_img

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात तातडीने आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे. सततच्या पावसामुळे मुंबई, पुणे आणि कोकणासह अनेक भागांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याच्या घटना घडत असून, जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, यावेळी निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत अभूतपूर्व आणि चिंताजनक आहे. मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग, जुना महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प परिसर तसेच आळंदीतील पूरस्थिती यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या असून, अनेक महत्त्वाचे मार्ग बंद असल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे त्या म्हणाल्या.

मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले असतानाही सध्या दिसणारे दृश्य अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट झाले होते का आणि नैसर्गिक आपत्तींचा विचार करून नियोजन झाले होते का, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विविध विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय आणि सुरक्षात्मक निकष पाळले गेले आहेत का, याचीही पारदर्शक चौकशी व्हावी, असेही त्या म्हणाल्या.

राज्यातील परिस्थिती गंभीर होत असताना सरकारने राजकीय वाद बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करावे, अशी ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ