शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शनिवारी उशिरा रात्री शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. गंगूबाई शिंदे सभागृहात झालेला हा पक्षप्रवेश सोहळा रात्री सुमारे १.१५ वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती; मात्र प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनाही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते विश्वास व्यक्त करत असल्याचे सांगितले. दूरदूरहून आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेऊन कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शुभांगी पाटील यांची शिंदे गटाच्या उपगट नेत्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नियुक्तीबाबतची घोषणा श्रीकांत शिंदे यांनी केल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.




