ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी सकाळी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. “ज्ञानोबा तुकाराम” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या मंत्रघोषांसह टाळ-मृदंगाच्या निनादात शेकडो वारकरी, महिला भक्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी मार्गस्थ झाली. ओतूर येथील श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून सुरू झालेल्या या पालखी सोहळ्याला वारी परंपरेत मानाचे स्थान असून, यंदा या सोहळ्याचे ६६ वे वर्ष आहे. संस्थापक महादेव तांबे, अध्यक्ष सागर दाते आणि सचिव अनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जुलै ते १२ ऑगस्ट असा एकूण ३९ दिवसांचा हा पदयात्रा सोहळा पार पडणार आहे.
पालखी प्रस्थानापूर्वी विविध धार्मिक विधी, अभिषेक आणि पूजन करण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. प्रगतीशील शेतकरी भगवान रामचंद्र तांबे यांच्या बैलजोडीला यंदाच्या पालखी रथासाठी मानाचा बहुमान देण्यात आला. रिमझिम पावसाच्या साक्षीने निघालेल्या या पालखी सोहळ्यात परिसरातील शेकडो वारकरी आणि महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ओतूर, आळे, बेल्हा, पारनेर, राळेगण सिद्धी, श्रीगोंदा, सिद्धटेक, राशीन, टेंभुर्णी, मोडलिंब आदी विविध गावांमधून प्रवास करत ही पालखी २२ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथे सात दिवसांच्या मुक्कामानंतर २९ जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होईल आणि आळंदी, जेजुरी, सासवड, राजगुरूनगर, नारायणगाव मार्गे १२ ऑगस्ट रोजी पालखीचे ओतूर येथे पुनरागमन होणार आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान भक्तिमय वातावरण, वारकरी परंपरेचा उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडणार आहे.




