राज्यातील राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असतानाच, बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हिंदुस्थानी भाऊ यांच्या एका वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. हिंदुस्थानी भाऊ यांनी दावा केला आहे की, ७ सप्टेंबरपर्यंत ठाकरे गटातील काही आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडू शकतात. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी, “तोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांनी आता स्वतःला सांभाळावे,” असा अप्रत्यक्ष इशारा दिला. याचवेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करत, “मी आधीच १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले होते. सचिन अहिर हा त्यातील पहिला बॉम्ब होता,” असा दावा केला.
हिंदुस्थानी भाऊ यांनी पुढे, “७ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील,” असेही सूचक वक्तव्य केले. मात्र, कोणते आमदार किंवा नगरसेवक पक्ष सोडणार आहेत, याबाबत त्यांनी कोणतीही नावे किंवा पुरावे सादर केलेले नाहीत.
दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ यांच्या या दाव्यांवर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.
सध्या या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, ७ सप्टेंबरपर्यंत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात आणि या वक्तव्याचे पडसाद कितपत उमटतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




