पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवान अनिल वाघ, पुंडलिक भुतापल्ले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सलग बचावमोहीम राबवली. दुर्घटनेनंतर तातडीने सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये जवानांनी जवळपास १४ तास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एअरबॅगसह विशेष बचाव उपकरणांचा वापर करत काळजीपूर्वक मार्ग तयार केला आणि कचऱ्याचे व ढिगाऱ्याचे थर हटवत एकामागोमाग नऊ जणांची सुखरूप सुटका केली. प्रत्येक क्षणी ढिगारा कोसळण्याचा आणि जीवाला धोका असतानाही जवानांनी धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे अनेकांना नवजीवन मिळाले असून, संपूर्ण राज्यातून अग्निशमन दलाच्या या साहसी कार्याचे कौतुक केले जात आहे.




