शोमध्ये एन्ट्री करताच अंगूरी भाभी आक्रमक, पण गोविंदाच्या पत्नीकडून मिळालं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “माझा नवरा ५० अफेअर करो, तुझ्या…”
टीव्हीचा अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘लॉक अप २’ (Lock Upp 2) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये नुकतीच ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. शिल्पाने जेलमध्ये पाऊल ठेवताच आपल्या आक्रमक अंदाजात इतर स्पर्धकांवर निशाणा साधायला सुरुवात केली. मात्र, बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा याच्या खाजगी आयुष्यावरून त्याची पत्नी सुनिता अहुजा हिला नडणे शिल्पाला चांगलेच महागात पडले आहे. गोविंदाचे नाव काढताच सुनिताचा पारा चढला आणि तिने शिल्पाला सगळ्यांसमोर खडे बोल सुनावले.
गेल्या काही काळापासून गोविंदा आणि सुनिता यांच्यात वितुष्ट आल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. सुनिताने शोमधील काही संभाषणांदरम्यान गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल (एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स) थेट भाष्य केले होते. याच मुद्द्याचा धागा पकडत शिल्पा शिंदेने सुनिताला घेरण्याचा प्रयत्न केला. शिल्पा म्हणाली, “लोकांचा तुमच्याबद्दल गैरसमज झाला आहे. मी गोविंदाची खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्ही असे कसे वागू शकता? जगासमोर असे कसे बोलू शकता? हे सगळे बोलताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते?”
शिल्पाचा हा प्रश्न ऐकून सुनिता प्रचंड भडकली. तिने शिल्पाला जागेवरच रोखत सडेतोड उत्तर दिले, “कधीतरी स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. जेव्हा तुझ्यावर अशी परिस्थिती ओढवेल आणि तू स्वतः ते अनुभवशील, तेव्हाच तुला माझी बाजू कळेल. हे माझे आयुष्य आहे आणि मला जे योग्य वाटते ते मी करेन. तो माझा नवरा आहे; तो भले १० वेगवेगळ्या ठिकाणी काहीही करो, पण मी त्याला कधीच सोडणार नाही. मी मरेपर्यंत त्याच्यावरच प्रेम करेन.” सुनिताचा हा रुद्रावतार पाहून शिल्पाने पुढे वाद न वाढवता तिथून काढता पाय घेणेच पसंत केले.
शिल्पा तिथून निघून गेल्यावरही सुनिताचा राग शांत झाला नव्हता. तिने सह-स्पर्धक राम कपूरजवळ आपला सगळा संताप व्यक्त केला. सुनिता म्हणाली “तो माझा नवरा आहे आणि तो काहीही करू शकतो, त्याच्या विरोधात बोलण्याचा या जगात कोणालाही अधिकार नाही. मी त्याची अधिकृत बायको आहे. या शिल्पाला इथे फक्त इतरांना उकसवण्यासाठी आणि ‘उंगल्या’ करण्यासाठीच पाठवलेलं दिसतंय. जर तिने मर्यादा ओलांडली, तर माझ्याकडून आणखी ऐकावं लागेल. मी माझ्या लायकीवर येईन. माझ्या कुटुंबाला यात ओढू नका. माझा नवरा ५० अफेअर करो, तुझ्या बापाचं काय जातंय?”
शिल्पा शिंदेने शोमध्ये येताच सुनिताशिवाय आकांक्षा चमोला आणि शिवांगी जोशी यांनाही टार्गेट करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे जेलमधील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या वादाव्यतिरिक्त सुनिता अहुजा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना अत्यंत भावूक झालेली पाहायला मिळाली. तिचे अश्रू पाहून शोची सूत्रसंचालक (होस्ट) फराह खानने तिचे सांत्वन केले आणि तिचा आत्मविश्वास वाढवला. फराह सुनिताला म्हणाली, “तू स्वतःला कमी समजू नकोस. तू फक्त गोविंदाची पत्नी नाहीस, तर तू स्वतः एक सुपरस्टार आहेस!”




