Telengana Crime : तेलंगणात क्रूरतेचा कळस! पहिल्यांदा गच्चीवरून ढकलले, तिथे वाचला तर नर्स पत्नीने सलाईनमधून दिले टॉयलेट क्लिनर!

spot_img

खाडी देशातून परतलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकरासोबत रचला भयंकर कट; वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करत रुग्णालयातच संपवला जीव

देशभरात आधीच विविध गुन्हेगारीच्या घटनांमुळे भीती आणि चिंतेचे वातावरण असताना, तेलंगणातून (निझामाबाद जिल्हा) माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत क्रूर आणि थरारक हत्येची घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय नर्सने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून स्वतःच्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येची ही भयानक पद्धत पाहून स्वतः पोलीस आणि डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

३५ वर्षीय प्रशांत हे गेल्या काही काळापासून कामानिमित्त आखाती (खाडी) देशात राहत होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थिती पाहता ते काही दिवसांपूर्वीच भारतात आपल्या गावी परतले होते. भारतात आल्यानंतर प्रशांत यांना त्यांची पत्नी संध्या हिचे अनिल नावाच्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागली. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद आणि भांडणे होऊ लागली. आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रशांत यांना कायमचे संपवण्यासाठी संध्या, तिचा प्रियकर अनिल आणि अनिलचा मित्र व्यंकट साई यांनी मिळून एक खळबळजनक कट रचला.

२९ जून रोजी कटानुसार, व्यंकट साई हा प्रशांत यांच्या घरी गेला. तिथे त्याने प्रशांत यांना मोठ्या प्रमाणात दारू पाजली आणि नशेत त्यांना इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेला. तिथे प्रियकर अनिलने फोनवरून दिलेल्या सूचनेनुसार, व्यंकट साईने प्रशांत यांना थेट गच्चीवरून खाली ढकलून दिले. या भीषण अपघातात प्रशांत गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला. नशेत असल्यामुळे स्वतः प्रशांत यांनाही नेमके काय घडले, याचा अंदाज आला नाही.

गच्चीवरून पडून जखमी झालेल्या प्रशांत यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रशांत वाचल्यामुळे आपले बिंग फुटेल अशी भीती आरोपींना वाटू लागली. संध्या स्वतः पेशाने नर्स असल्याने तिला वैद्यकीय प्रक्रियेची आणि औषधांची अचूक माहिती होती. याचाच फायदा उठवत तिने रुग्णालयात उपचार सुरू असताना क्रूरतेचा कळस गाठला.

संध्या उपचाराच्या बहाण्याने प्रशांत यांच्याजवळ थांबली. प्रशांत यांच्या हाताला आधीच सलाईनसाठी ‘कॅन्युला’ (Intravenous Cannula) लावलेला होता. संध्याने कोणाचेही लक्ष नसताना त्या कॅन्युलाद्वारे प्रशांत यांच्या सलाईनमध्ये थेट टॉयलेट क्लिनर (बाथरूम साफ करण्याचे अ‍ॅसिडयुक्त द्रव) आणि भूल देणारे औषध (Sedatives) इंजेक्शनद्वारे टोचले. हे विषारी द्रव थेट रक्तात गेल्यामुळे प्रशांत यांची प्रकृती वेगाने बिघडली आणि रुग्णालयातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रशांत यांच्या मृत्यूनंतर संध्याने तो खाटेवरून पडून झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, प्रशांत यांच्या आईला संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयास्पद हालचालींच्या आधारे तपास केला असता, या तिघांचा भयंकर कट समोर आला.

पोलीसांनी तात्काळ कारवाई करत पत्नी संध्या, प्रियकर अनिल आणि त्याचा मित्र व्यंकट साई या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ