दारूचे व्यसन आणि सततचे भांडण ठरले कारणीभूत; संशयास्पद प्लास्टरमुळे ‘शातीर’ पत्नीचा खोटेपणा उघड
उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक हत्याकांड समोर आले आहे, ज्याने केवळ पोलीस प्रशासनालाच नव्हे, तर संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. सिंकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका धाम कॉलनीमध्ये राहणारे ४४ वर्षीय सुरेंद्र कुमार शर्मा १८ मे पासून अचानक बेपत्ता झाले होते. संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक त्यांचा अहोरात्र शोध घेत असताना, त्यांची पत्नी रुबी मात्र “ते कुठे तरी गेले आहेत, लवकरच परत येतील” असे सांगून सर्वांची दिशाभूल करत होती. अखेर ४५ दिवसांनंतर सुरेंद्र यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुमच्या फरशीखाली गाडलेल्या अवस्थेत सापडला असून, या संपूर्ण भयानक कटाची मास्टरमाइंड स्वतः त्यांची पत्नी रुबी असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र यांना दारूचे भयंकर व्यसन होते, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये रोज जोरदार भांडणे व्हायची. याच वादातून रुबीने पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. २६ मे रोजी तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवली होती, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मात्र, पोलिसांच्या तपासात तिच्या विधानांमध्ये विसंगती आढळू लागली. दरम्यान, शुक्रवारी पोलीस एका जुन्या प्रकरणाच्या पडताळणीसाठी सुरेंद्र यांच्या घरी पोहोचले असता, रुबी कमालीची घाबरली. तिची बदललेली देहबोली पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्याच वेळी सुरेंद्र यांचा भाऊ अनिल शर्मा यानेही पोलिसांकडे वहिनीच्या वागण्यावर संशय व्यक्त केला.
संशयाच्या आधारे पोलिसांनी घराची कसून झडती घेण्यास सुरुवात केली. जेव्हा पोलीस बाथरुममध्ये पोहोचले, तेव्हा तिथल्या जमिनीवर नुकतेच नवीन प्लास्टर आणि लादी बसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने तिथे खोदकाम सुरू केले. काही फूट खाली खणताच तिथे सुरेंद्र यांचा कुजलेला मृतदेह सापडला. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच घराबाहेर स्थानिक नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
पोलिसांनी आरोपी पत्नी रुबीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. धक्कादायक बाब म्हणजे, सुरेंद्र यांची हत्या करण्यापूर्वीच तिने बाथरुमच्या तोडफोडीसाठी आणि दुरुस्तीसाठी मिस्त्री व मजुरांची व्यवस्था करून ठेवली होती. मृतदेह कुजताना वास येऊ नये म्हणून त्यावर मातीचा थर देऊन वरून सिमेंटचे पक्के प्लास्टर करण्यात आले होते.
या क्रूर हत्याकांडात रुबीला आणखी कोणी मदत केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुढील तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आग्र्यात या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे.




