Byculla Muharram Case : मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीत ‘सामूहिक विषप्रयोगाचा’ मोठा कट उधळला; पेनकिलर सांगून वाटत होता उंदीर मारण्याचे औषध!

spot_img

भायखळा पोलिसांकडून पुणेकर आरोपीला अटक, १४,९०० विषारी कॅप्सूल्स जप्त; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला भीषण अनर्थ

मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरमच्या ‘आशूरा’ जुलूस (मिरवणूक) दरम्यान हजारो भाविकांना लक्ष्य करण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांना वेदनाशामक (पेनकिलर), व्हिटॅमिन्स किंवा इम्युनिटी बूस्टर असल्याचे सांगून विषारी गोळ्या वाटणाऱ्या एका ४१ वर्षीय इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. फैयाज निसार हुसैन प्रेमजी असे या आरोपीचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीकडून तब्बल १४,९०० तयार कॅप्सूल्स जप्त केल्या असून मुंबईच्या इतिहासातील एक मोठा घातपाताचा कट निकामी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील भायखळा ते रे रोड दरम्यान मोहरमची मिरवणूक सुरू असताना, एक संशयास्पद व्यक्ती लोकांना मोफत कॅप्सूल्स वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी लोकांना या गोळ्या आरोग्यासाठी चांगल्या आणि वेदनाशामक असल्याचे सांगून बळजबरीने खाण्यास प्रवृत्त करत होता. काही नागरिकांनी या गोळ्या घेतल्यावर त्यांना उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून फैयाज प्रेमजीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ ध्वनिक्षेपकावरून (स्पीकर) घोषणा करत गर्दीला या गोळ्या न खाण्याचे आवाहन केले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि जप्त केलेल्या कॅप्सूल्सच्या तपासणीत एक अत्यंत भयानक वास्तव समोर आले आहे. या कॅप्सूल्समध्ये ‘झिंक फॉस्फाईड’ (Zinc Phosphide) नावाचे घातक रसायन भरण्यात आले होते, ज्याचा मुख्य वापर उंदीर मारण्याचे औषध म्हणून केला जातो. हे रसायन पोटात गेल्यानंतर शरीरातील ॲसिडसोबत प्रक्रिया करून अत्यंत विषारी ‘फॉस्फरस वायू’ तयार करतो. हा वायू मानवी शरीराचे महत्त्वाचे अवयव (हृदय, फुफ्फुसे, यकृत आणि मेंदू) निकामी करतो, जे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास अत्यंत जीवघेणे ठरू शकते. आरोपीने ऑनलाईन माध्यमातून तब्बल ३०,००0 रिकाम्या कॅप्सूल्स आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड पावडर मागवली होती आणि मुंबईतील डोंगरी भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये राहून तो गेल्या १५ दिवसांपासून या कॅप्सूल्स स्वतः हाताने भरत होता, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी फैयाज प्रेमजी हा पुण्याच्या उच्चभ्रू विमान नगर भागातील रहिवासी असून त्याचे बीए (BBA) पर्यंत शिक्षण झाले आहे आणि तो कौटुंबिक पेंट व्यवसायाशी संबंधित आहे. आधी कोणताही मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या या व्यक्तीने एवढा मोठा कट का रचला, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान आरोपीने २०२५ मध्ये इराण आणि इराकचा दौरा केल्याचे समोर आले असून, त्याचे या कृत्यामागे काही आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी नेटवर्क आहे का, याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. आरोपीचा मोबाईल फोन, डिजिटल डेटा, बँक व्यवहार आणि गुगल सर्च हिस्ट्रीची कसून चौकशी केली जात असून फॉरेन्सिक लॅबच्या अंतिम रासायनिक अहवालाची (Chemical Analysis Report) प्रतीक्षा आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ