फांदी तोडल्यास ५ हजारांचा दंड अन् थेट तुरुंगवास; पालिकेकडून महिलांना निसर्ग रक्षणाचे महत्त्वाचे आवाहन
वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि वेळेअभावी अनेक नोकरदार महिला बाजारातून वडाची फांदी विकत आणून घरातच पूजा करणे पसंत करतात. पण आता असे करणे महागात पडू शकते. आगामी वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) वडाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यावर सक्त बंदी घातली आहे. अनधिकृतपणे फांद्या तोडताना आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिकेच्या उद्यान विभागाने दिला आहे.
पालिकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ च्या कलम २१ अंतर्गत वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड किंवा त्याची फांदी कापणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. या नियमाचे उल्लंघन करून अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर १,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचा आर्थिक दंड आकारण्यात येईल. तसेच, या गुन्ह्यासाठी कमीत कमी एक आठवडा ते जास्तीत जास्त एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.
नोकरदार महिलांच्या सोयीसाठी अनेक विक्रेते सार्वजनिक रस्त्यांवरील किंवा खासगी आवारातील वडाच्या झाडांची कत्तल करतात आणि या फांद्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणतात. या बेसुमार वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी सोमवार, २९ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त सर्व उद्यान अधीक्षक आणि सहायक उद्यान अधीक्षकांना विशेष सतर्क राहण्याचे आणि गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहरात ठिकठिकाणी वडाची झाडे उपलब्ध आहेत. त्यामुळे सुवासिनींनी बाजारातून फांदी विकत आणून घरात पूजा करण्याऐवजी, प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी आणि निसर्ग संवर्धनाच्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.




