Amit Thackeray On TET Papaer Leak : “तुमची सिस्टीम एवढी सडलीये का?” टीईटी पेपरफुटीनंतर अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात; ‘अख्ख्या सिस्टीमचा पेपर फाडू’ दिला थेट इशारा

spot_img

भिवंडीतील छाप्यात परीक्षा रद्द झाल्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आक्रमक; १०वी-१२वीत साधे पासिंग मार्क्स मिळवणारे टॉपर कसे येतात? उपस्थित केला सवाल

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या महाघोटाळ्यानंतर आता महाराष्ट्रातही ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी भिवंडीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पेपर लीक झाल्याचे उघड झाले आणि परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली. या धक्कादायक प्रकरणानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक पोस्ट लिहीत राज्य सरकार आणि शिक्षण खात्याचे वाभाडे काढले आहेत. “तलाठी, पोलीस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी… तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीये का???” असा थेट आणि तिखट सवाल अमित ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट मांडली आहे. “गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील संधीसाधूंनी परीक्षा हा ‘प्रश्नपत्रिका विकण्याचा अधिकृत धंदा’ बनवला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील बदलत्या शैक्षणिक वातावरणावर बोट ठेवत ते म्हणाले, “ज्या राज्याला मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे, तिथे १२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी चक्क ड्रोन लावावे लागतात आणि १०७ परीक्षा केंद्र काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावी लागतात, ही महाराष्ट्राची प्रगती आहे का? १०वी-१२वीत साधे पासिंग मार्क्स मिळवणारी मुले एमएचटी-सीईटी (MHT-CET) मध्ये थेट १०० पर्सेन्टाईल मिळवून टॉपर येतात, हा कोणता चमत्कार आहे?”

लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण खात्याला अमित ठाकरेंनी धारेवर धरले. “पेपरफुटी विरोधात कडक कायदे आणण्याच्या ज्या पोकळ बाता तुम्ही मारता, ते कायदे काय फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी ठेवले आहेत का? की दरवेळेप्रमाणे ‘आम्ही चौकशी समिती नेमली आहे’ हा नेहमीचा गुळगुळीत संवाद पुढे करून तुम्ही मोकळे होणार?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला. दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या तरुणांची चूक एवढीच आहे का, की तो लाच देऊन पेपर खरेदी करू शकत नाही, अशी विचारणा करत सध्याचे सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य सोडून ‘ऑपरेशन टायगर’ सारख्या घाणेरड्या राजकारणात मग्न असल्याची टीका त्यांनी केली. पोस्टच्या शेवटी त्यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला की, “लक्षात ठेवा, जर या तरुणांचा संयम सुटला ना, तर तुमच्या या अख्ख्या भ्रष्ट सिस्टीमचा ‘पेपर’ फाडल्याशिवाय ते राहणार नाहीत!”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ