Vijay Wadettiwar : ठाकरे-फडणवीस यांच्या विमान प्रवासावर वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया; “भाजपकडे जागाच नाही, तर ठाकरेंची गरज काय?”

spot_img

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, आणि याच अनपेक्षित घडामोडींची प्रचिती काल पुन्हा एकदा आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल योगायोगाने एकाच विमानाने प्रवास केला. दोन कट्टर राजकीय विरोधक एकाच विमानात समोरासमोर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासात दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का, यावर तर्कवितर्क लढवले जात असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर अत्यंत रोखठोक आणि मोठे विधान केले आहे.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या विमान प्रवासाला केवळ एक ‘योगायोग’ म्हटले आहे. “भाजपला आता उद्धव ठाकरेंची अजिबात गरज नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सध्या सत्ताधारी भाजपकडे २०० हून अधिक आमदारांचे प्रचंड संख्याबळ आहे, त्यामुळे त्यांना कोणाचीही गरज उरलेली नाही. जर त्यांनी आणखी नवीन लोकांना पक्षात घेतले, तर त्यांना ठेवायला जागा कुठे आहे? त्यामुळे या केवळ फालतू गोष्टी आणि अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दर शनिवार-रविवारी नागपूरला जातात आणि योगायोगाने उद्धव ठाकरे यांचाही त्याच दिवशी दौरा असल्याने हे दोन्ही नेते एकाच डोमेस्टिक विमानात एकत्र आले, त्यामागे कोणताही राजकीय मेसेज नाही, असा खुलासा त्यांनी केला.

याच दरम्यान, वडेट्टीवार यांनी राज्यातील ‘फोडाफोडीच्या राजकारणावर’ तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता सध्याच्या या गलिच्छ राजकारणाला कंटाळली असून लोकांमध्ये प्रचंड राग आहे, असे ते म्हणाले. ज्या चिन्हावर निवडून आले, तो पक्ष सोडायचा असेल तर आधी आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांना संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठी षडयंत्रे रचली जात असून लोकशाही धोक्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, या सगळ्यातूनही उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेईल आणि ज्या प्रकारे जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत आहे, ते पाहता उबाठा पक्ष नव्या जोमाने उभा राहील, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ