संत नामदेव, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र; ज्याने देशाला नेहमीच वैचारिक दिशा दिली आणि राजकीय संस्कृतीचा एक आदर्श घालून दिला. परंतु, आज याच महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. कालपर्यंत ज्या नेत्यांना जनता अभ्यासू आणि सुसंस्कृत समजत होती, तेच नेते आज कॅमेऱ्यासमोर राजरोसपणे अत्यंत शिवराळ आणि पातळीहीन भाषेचा वापर करताना दिसत आहेत. ‘संजय’ या नावाचा अर्थ ‘ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे’ असा होतो. मात्र, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन ‘संजय’—आमदार संजय गायकवाड, खासदार संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील—यांच्या वर्तनामुळे आणि विधानांमुळे राज्याची राजकीय संस्कृती आणि प्रतिष्ठा मलिन झाली आहे. राजकीय मतभेद, पक्षांतर आणि टीकाटिप्पणी ही लोकशाहीत नवीन नाही, पण टीकेची एक सभ्यता आणि मर्यादा असते, जी आज पूर्णपणे संपुष्टात आली आहे.
या भाषिक आणि सांस्कृतिक ऱ्हासाची सुरुवात विविध घटनांमधून स्पष्टपणे दिसून येते. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या शीर्षकावरून थेट पुस्तक प्रकाशकालाच फोनवरून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली. दुसरीकडे, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे तर रोज सकाळी पत्रकार परिषदांमधून पक्षातून फुटलेल्या नेत्यांवर दिल्लीत बसून शिव्यांची लाखोली वाहिलेली पाहायला मिळत आहे. या वादात आता खासदार संजय दिना पाटील यांनी तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरच थेट माध्यमांसमोर शिव्यांचा वर्षाव केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली; ज्यानंतर सर्व स्तरांतून झालेल्या तीव्र टिकेमुळे त्यांना जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरून गंभीर शिवीगाळ व धमकी. यापूर्वी मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कामगाराला गुंडासारखी मारहाण केल्याचाही आरोप. राजकीय फुटीनंतर पत्रकार परिषदांमधून सातत्याने विरोधकांवर आणि बंडखोरांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका व शिवीगाळ. कौटुंबिक आणि राजकीय प्रश्नांवर चिडून थेट पत्रकारांनाच आई-बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्या आणि ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’ अशी धमकी दिली. विधानभवनाच्या परिसरातच विरोधी पक्षाच्या आमदाराच्या समर्थकांना मारहाण. तसेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अमर्याद भाषेत टीका.
महाराष्ट्रात यापूर्वी यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यांसारखे दिग्गज झाले, ज्यांच्यात टोकाचे वैचारिक मतभेद असूनही त्यांनी कधीही भाषेची मर्यादा ओलांडली नाही. अगदी आधुनिक काळात अजित पवार यांचे उदाहरण घेतले, तर त्यांच्याकडून भूतकाळात धरणासंदर्भात एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य झाले होते. परंतु, त्यांनी त्याची जाहीरपणे माफी मागितली आणि त्यानंतर सार्वजनिक जीवनात कधीही त्यांच्या तोंडून अपशब्द निघाला नाही, याला राजकीय परिपक्वता म्हणतात. मात्र, आजच्या नेत्यांमध्ये हा संयम पूर्णपणे गायब झाला आहे.
या संपूर्ण प्रकारात सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, सत्ताधारी महायुतीचे आमदार किंवा त्यांना पाठिंबा देणारे नेते जेव्हा कायदा आणि भाषेची मर्यादा ओलांडतात, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही ठोस किंवा कडक कारवाई होताना दिसत नाही. शासनाच्या या मूकसंमतीमुळे ‘अशा वाचाळवीरांना राजकीय फायद्यासाठी अभय दिले जात आहे का?’ असा प्रश्न जनतेला पडत आहे. तसेच, टीआरपीच्या शर्यतीत अशा शिवराळ नेत्यांना अवाजवी प्रसिद्धी देणाऱ्या माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. सरकारे येतील आणि जातील, पण नष्ट होत चाललेली महाराष्ट्राची सुसंस्कृत ओळख पुन्हा मिळवणे अशक्य होईल. त्यामुळे आता मतदारांनीच कोणत्याही पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा गुंडगिरी करणाऱ्या आणि भाषेची मर्यादा न राखणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.




