“मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे”; मनसे प्रमुखांनी जैन प्रतिनिधींना आपल्या खास शैलीत दिली समज
मुंबईतील मालाड भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘जिरे टोपा’वर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक संतापजनक घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि मराठी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जैन समाजाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबद्दल राज ठाकरे यांच्याकडे एक लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला. राज ठाकरे यांनीही मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत, आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत जैन प्रतिनिधींना समज दिली. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी दुकानांच्या मराठी पाट्यांवर पांढरे पट्टे ओढण्याचे जे प्रकार सुरू आहेत, त्यावरून मराठी आणि जैन समाजात नाहक वितंडवाद निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे वाद तातडीने थांबवून प्रत्येकाने मराठी भाषेचा आणि अस्मितेचा आदर राखलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या भेटीदरम्यान घडलेल्या चुकीबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. जैन समाजाने दिलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे की, १७ जून २०२६ रोजी मालाडमधील दफ्तरी रोड, शिवाजी चौक येथे असलेल्या छत्रपतींच्या जिरे टोपा पुतळ्यावर काही समाजकंटकांनी जैन ध्वज लावला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे सर्वोच्च आराध्य दैवत असून, त्यांचे जिरे टोप हे शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक प्रतीकाचा अवमान झाल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेश फरकसे यांनी केलेल्या आंदोलनानंतर हा ध्वज तातडीने हटवण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाबद्दल जैन समाजाने राज ठाकरे, मनसे सैनिक आणि समस्त मराठी जनतेची जाहीर माफी मागितली असून, भविष्यात अशा संवेदनशील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.




