Raj Thackeray : “देशात भयंकर स्थिती, भाजपचे लोकही हैराण”; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कडक इशारा, नाव न घेता ‘त्या’ खासदारावर जोरदार तोफ

spot_img

“ग्राउंडवर काम करा, ढीम्म बसू नका”; मतदारांची नावे कापली जात असल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सतर्कतेचा आदेश.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कडक शब्दांत मार्गदर्शन केले. ग्राउंडवर सक्रिय राहून काम करण्याचे आवाहन करताना त्यांनी पक्षांतर्गत शिस्तीवरही बोट ठेवले. “निवडणुकीच्या मैदानात उतरताना जर आपल्याकडे पुरेशी आयुधं नसतील, तर आपण लढणार कसे? आपल्याच हक्काच्या मतदारांची नावे मतदार यादीतून पद्धतशीरपणे कापली जात आहेत, अशा वेळी तुम्ही काय करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा दाखला देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे ‘अलर्ट’ आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले. विभाग अध्यक्षांची कानउघाडणी करताना ते म्हणाले की, केवळ ढीम्म बसून चालणार नाही; उपविभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांवर तुमचा कोणताही वचक दिसत नाही, ही पद्धत बदलली पाहिजे. आजपासून आणि याच क्षणापासून सर्वांनी तातडीने कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर घणाघाती टीका करताना, “सध्या सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. देशात इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे की, खुद्द भाजपचे अंतर्गत लोकही या सर्व प्रकारांमुळे प्रचंड हैराण झाले आहेत. हे सरकार जेव्हा सत्तेतून जाईल, तेव्हा आपल्याला तर आनंद होईलच, पण त्याहून मोठा आनंद भाजपच्याच लोकांना होईल,” असा टोलाही त्यांनी लगावला.

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कॅमेऱ्यासमोर वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचा समाचार घेतला. नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले, “एका भागाचा खासदार जाहीरपणे बोलतो की मी ५ खून केलेत आणि बॉम्ब फोडीन. एखादा गुंड किंवा गँगस्टरसुद्धा अशी भाषा वापरणार नाही, अशी भाषा इथले लोकप्रतिनिधी जाहीरपणे बोलत आहेत. इतके भयंकर दावे करूनही त्यांच्यावर अजून साधी चौकशी का होत नाही? त्यांनी नक्की कोणाचे खून केले आणि कुठे बॉम्ब फोडले, याचा जाब गृहखात्याने विचारायला हवा.” याशिवाय, याच मेळाव्यात काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपाच्या पुतळ्यावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या वादाचाही संदर्भ आला. या गंभीर चुकीनंतर जैन समाजाच्या मुख्य शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असून, घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा सुपूर्द करून दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ