“इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबी आणि माफिया एकत्र”; आयुक्त मुंढेंच्या जीवाला धोका असल्याने कडक सुरक्षेची मागणी, बदली न करण्याची मंत्री झिरवाळांची ग्वाही
आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस (IAS) अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवनयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे सध्या पुन्हा एकदा तीव्र चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी चर्चा त्यांच्या धडक मोहिमेची नसून, त्यांच्या बदलीसाठी लावण्यात आलेल्या अवाढव्य किमतीची आहे. “प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची ‘विकेट’ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी एकत्र येऊन तब्बल २५० कोटी रुपयांचा फंड गोळा केला आहे,” असा खळबळजनक आणि पूर्वइतिहास नसलेला आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभेत केला आहे. या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.
बुधवारी विधानसभेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर आणि अन्नपदार्थांतील भेसळीवर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड कमालीचे आक्रमक झाले. बाजारातील भेसळयुक्त अन्न आणि औषधांमुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार वाढत असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “जेव्हा या माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखा प्रामाणिक अधिकारी तिथे येतो, तेव्हा अख्खी ड्रग्ज लॉबी त्यांच्या पाठीमागे लागते. मुंढेंची बदली व्हावी यासाठी २५० कोटी रुपयांची जणू सुपारीच घेण्यात आली आहे. मी पुढील आठवड्यात सोमवारच्या अधिवेशनात या संपूर्ण रॅकेटमध्ये कोण-कोण बडे चेहरे सामील आहेत, याचा नावानिशी पर्दाफाश करणार आहे.” पालघर किनारपट्टीवर उतरणारा गुटखा संपूर्ण महाराष्ट्रात कसा फिरतो, असा सवाल करत त्यांनी अंतर्गत अधिकाऱ्यांच्या लॉबीवर आणि लॅबमधील सेटलमेंटवरही थेट बोट ठेवले. तसेच, विद्यमान मंत्री नरहरी झिरवाळ हे साधे गृहस्थ असून सध्या हे खातं पडद्यामागून दुसरीच कोणतीतरी शक्ती चालवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
“संत तुकाराम आणि संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील गुरुबंधू होते. आता आयुक्त तुकाराम मुंढे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एकत्र येऊन राज्यातील ही माफिया व्यवस्था स्वच्छ करावी. प्रामाणिक अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी त्यांची किमान ३ वर्षे बदली करू नये.” सुधीर मुनगंटीवार (भाजप नेते व आमदार)
आव्हाडांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंचे आमदार मुंढेंच्या समर्थनासाठी एकत्र आले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंढेंच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. तर दुसरीकडे, आमदार अर्जुन खोतकर यांनी, “तुकाराम मुंढे यांना अंडरवर्ल्ड आणि वेगवेगळ्या माफियांकाडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे; सरकारने त्यांची सुरक्षा तातडीने वाढवावी,” अशी आग्रही मागणी केली.
या प्रचंड गदारोळानंतर आणि २५० कोटींच्या कथित फंडाच्या आरोपावर स्वतः अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात उभे राहून मोठी घोषणा केली. “तुकाराम मुंढे यांची कोणतीही बदली होणार नाही! ते अत्यंत उत्तम काम करत असून हे संपूर्ण सभागृह आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाही मंत्री झिरवाळ यांनी दिली. मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मुंढेंच्या बदलीच्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला असला, तरी २५० कोटींचा आंतरराष्ट्रीय कट आणि मुंढेंच्या २१ वर्षांच्या सेवेतील २५ बदल्यांचा इतिहास पाहता, आगामी काळात विरोधकांच्या पुराव्यांच्या ‘बॉम्ब’नंतर सिस्टीममधील भ्रष्टाचाराचे कोणते मोठे धागेदोरे समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




