अवघ्या ५५ दिवसांत गुन्हा सिद्ध; कोर्टात न्यायमूर्तींच्या जळजळीत सवालाने पसरली शांतता, सरकारी वकिलांची फाशीची मागणी
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्यंत क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या खटल्यात आज पुणे विशेष न्यायालयाने ऐतिहासिक वेग दाखवत आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले आहे. निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला थेट सुनावले, “१ मे रोजी तू काय कृत्य केलेस ते तुझ्या अंतःकरणाला विचार. तो प्रसंग आठव आणि स्वतःच सांग, तुला कोणती शिक्षा योग्य वाटते… फाशी की जन्मठेप?”
न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी वकील अजय मिसार यांनी अत्यंत आक्रमक आणि प्रभावी युक्तिवाद केला. सुट्टी घालवण्यासाठी आजीकडे आलेल्या या चिमुकलीची आरोपी २५ एप्रिलपासूनच ‘रेकी’ (पाळत) करत होता, हे पुराव्यांसह सिद्ध करण्यात आले. १ मे रोजी या नराधमाने त्या निष्पाप बालिकेला गोठ्यात नेऊन तिच्यावर तब्बल ३९ मिनिटे अत्यंत घृणास्पद व पाशवी अत्याचार केले आणि तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय अहवालानुसार मुलीच्या मृत्यूनंतरही त्याने तिचे शोषण सुरूच ठेवले होते. हे कृत्य चालू असताना तिथे आलेल्या ४-५ लहान मुलांनाही आरोपीने दगड मारून हाकलून लावले होते.
“अशा विकृत व्यक्तीला समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. जर त्याला मृत्यूदंड दिला नाही, तर तो तुरुंगातही इतर कैद्यांसाठी धोक्याचा ठरेल,” असे सांगत सरकारी वकिलांनी नराधम कांबळेला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. आरोपीवर ठेवण्यात आलेले सर्व गंभीर आरोप पुराव्यांनिशी सिद्ध झाले असून, या प्रकरणाची अंतिम शिक्षा २९ जून रोजी सुनावली जाणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या नराधमाला मिळणाऱ्या कठोरात कठोर शिक्षेकडे लागले आहे.




