Nikhil Chavan Ukhana : निखिल-अनुष्का अडकले लग्नबंधनात, अभिनेत्याच्या ‘राजकीय’ उखाण्याची जोरदार चर्चा

spot_img

संगीत सोहळ्यात आमदारांच्या बंडाचा उल्लेख करत मारली ‘एन्ट्री’

छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेली ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील मुख्य जोडी अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण आता खऱ्या आयुष्यात साता जन्माचे सोबती झाले आहेत. जवळपास पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि तिचे रूपांतर प्रेमात झाले. नुकताच या गोड जोडीचा शाही विवाहसोहळा छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नाआधी पार पडलेल्या हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे अनेक रंगतदार व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगत आहे ती अभिनेता निखिल चव्हाण याने संगीत समारंभात घेतलेल्या एका भन्नाट आणि राजकीय उखाण्याची!

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या पडझडीचा आणि बंडाचा अचूक वेध घेत निखिलने आपल्या संगीत सोहळ्यात एक जबरदस्त उखाणा घेतला. राज्यातील सत्तानाट्यावर थेट भाष्य करताना तो म्हणाला, “अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार… मी जरी असलो जबाबदार, तरी माझ्या आनंदासाठी अनुष्काच जबाबदार!” त्याचा हा अनोखा आणि मिश्कील उखाणा ऐकताच सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वच कलाकारांनी आणि पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला दाद दिली. “लग्नसराई सुरू झाली लवकरच दारी येणार निखिलची वरात… तू तू मी मी चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात.” – अनुष्का सरकटे

या विवाहबंधनापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी या जोडप्यासाठी एका खास केळवणाचे (लग्नाआधीचे जेवण) आयोजन केले होते. या घरगुती कार्यक्रमाला शर्मिला शिंदे आणि कमलाकर सातपुते यांसारखे कलाकारही उपस्थित होते. या केळवणातही या दोघांमध्ये उखाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. अनुष्काने तिच्या उखाण्यातून घरात होणाऱ्या ‘तू तू मी मी’चा उल्लेख केला होता, ज्याला उत्तर देताना निखिलने भरत जाधवांच्या ‘सही रे सही’ नाटकाचा संदर्भ जोडत उखाणा घेतला, “भरत सरांना सांगितलं मी लग्न करतोय, तर सर म्हणाले सही रे सही… अनुष्का वचन दिले मी तुला, कधी होणार नाही तू तू मी मी.” रीअल लाईफमध्ये ‘कारभारी’ झालेल्या या लाडक्या जोडीवर सध्या सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ