ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पंढरपूर सायकल वारी यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. ग्रुपचे सचिव गणेश डुंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी ओतूर येथून २६ सायकलस्वारांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ओतूर, नारायणगाव, मलठण, रांजणगाव, चौफुला आणि इंदापूर मार्गे प्रवास करत या सायकलस्वारांनी सुमारे २८५ किलोमीटरचे अंतर पार केले. रविवार, २१ जून रोजी दुपारी ते पंढरपूर येथे पोहोचले.
या उपक्रमाचे हे सलग पाचवे वर्ष असून, ‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ आणि ‘सायकल चालवा, तंदुरुस्त रहा’ असा सामाजिक संदेश देत वारी पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रवासात वारकरी परंपरेचा उत्साह आणि भक्तीभाव अनुभवायला मिळाला. या वारीत प्रदीप गाढवे, विलास तांबे, उमाकांत अवसरीकर, मारुती घाडगे, सुभाष लोहोटे, अविनाश गायकवाड, दत्तात्रय बोडके, डॉ. मिलिंद घोरपडे, अशोक जगदाळे, डॉ. पोपट चौधरी, सतीश निमसे, प्रकाश डुंबरे, निवृत्ती घोलप, सुंदरराव ढाकणे, शेखर गाढवे, सचिन मुळे, जयदीप डुंबरे, रोहित बारसोडे, संदेश डुंबरे, सिद्धेश्वर भोसले, प्रवीण शेळके, समीर पानसरे, अमित महाकाळ, वीर जायभाये आणि आयुष चौधरी यांच्यासह अनेक सायकलप्रेमींनी सहभाग नोंदविला.
वारीदरम्यान चंद्रकांत साठे, न्हावरे ग्रामस्थ, अविनाश गायकवाड, सुभाष लोहोटे, दत्तात्रय बोडके, सचिन तांबे, किशोर सुंदराणी, भरत कानगुडे, आबा पाटील, श्री आदमिले आणि श्री नागटिळक यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पंढरपूर येथे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सायकल वारीचे स्वागत करून सहभागींचा सत्कार केला.




