भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज रोहित शर्मा याला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने अधिकृतपणे गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष नागरी सत्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहितला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्णधार म्हणून भारतीय संघाला २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितच्या या यशाने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सत्कार समारंभाला उपस्थित राहू शकला नव्हता, मात्र मंगळवारी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील सोहळ्यात त्याचा हा गौरव करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान राष्ट्रपती भवनात एक अतिशय भावनिक आणि सुंदर क्षण पाहायला मिळाला. जेव्हा व्यासपीठावरून रोहित शर्माचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेली त्याची पत्नी रितिका सजदेह हिचा चेहरा कमालीच्या अभिमानाने खुलला. पतीला देशाचा इतका मोठा सन्मान मिळताना पाहून रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती तात्काळ आपल्या जागेवरून उभी राहिली आणि अत्यंत उत्साहाने टाळ्या वाजवून तिने रोहितचे कौतुक केले. रितिकाचा हा भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.”मैदानावर जगातील भल्याभल्या गोलंदाजांना षटकार मारणारा हिटमॅन, खऱ्या आयुष्यात मात्र पत्नीच्या एका शब्दावर क्लिन बोल्ड झाला.”
या कौटुंबिक आणि गौरवशाली सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, या स्टार जोडप्याचा आणखी एक मजेशीर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. पुरस्कार सोहळ्याला जाताना कारमधील एका दृश्यात रितिकाने रोहितला अतिशय प्रेमाने त्याच्या आवडत्या सीटवरून उठून दुसऱ्या सीटवर बसण्याचा हट्ट केला. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना न डगमगणारा हा कर्णधार पत्नीच्या या गोड आग्रहापुढे मात्र पूर्णपणे शरण गेला. रोहितने हसतमुखाने गाडीतून उतरून आपली जागा रितिकासाठी सोडली आणि रितिकाही मोठ्या आनंदाने त्या सीटवर बसली. मैदानाबाहेरील रोहितचा हा साधेपणा आणि या जोडप्यामधील गोड केमिस्ट्री चाहत्यांच्या मनाला प्रचंड भावली असून, हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.




