मारिजान कापची वादळी खेळी भारतावर पडली भारी; केवळ एका पराभवामुळे टीम इंडियाचे नॉकआऊटचे समीकरण धोक्यात.
महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २१ जून रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग दोन विजय मिळवून फॉर्मात असलेल्या भारतीय संघाचा अश्वमेध आफ्रिकेच्या आव्हानासमोर रोखला गेला. या विश्वचषकाचे स्वरूप पाहता, या एका पराभवामुळे भारताच्या पुढील टप्प्यातील (नॉकआऊट फेरी) प्रवेशाच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण या गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ भारतापेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत दिसत आहेत.
गुणतालिकेचा विचार केला तर भारतीय संघ सध्या गट १ (Group 1) मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आपले तिन्ही सामने जिंकून ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने ३ पैकी २ सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचेही प्रत्येकी ४ गुण आहेत, परंतु सरस नेट रन रेटमुळे आफ्रिकन संघ भारताच्या मागे दबा धरून बसला आहे. दुसरीकडे, सलग तीन सामने गमावलेले पाकिस्तान आणि नेदरलँड्स हे संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार, एका गटातून केवळ दोनच संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने भारतासाठी आता प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असा असेल.
भारताचे पुढील दोन सामने बांगलादेश आणि बलढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. जर भारतीय संघ कांगारूंकडून पराभूत झाला, तर भारताचा प्रवास केवळ ६ गुणांवरच संपू शकतो. याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित दोन सामने बांगलादेश आणि नेदरलँड्ससारख्या तुलनेने कमकुवत संघांशी आहेत. आफ्रिकेने हे दोन्ही सामने जिंकल्यास ते ८ गुणांसह सहज उपांत्य फेरीत पोहोचतील. भारताला जर पुढचा रस्ता सुकर करायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावेच लागेल किंवा आफ्रिकेने एक सामना गमावावा अशी प्रार्थना करावी लागेल.
या सामन्याबद्दल बोलायचे तर, भारताने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेसमोर १५९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिजान काप हिने ८१ धावांची स्फोटक खेळी करत ५ चेंडू आणि ६ गडी राखून हे लक्ष्य सहज पार केले. या पराभवाला भारतीय संघाचे सुमार क्षेत्ररक्षणही कारणीभूत ठरले. भारताची फिरकीपटू राधा यादवने मारिजान काप २७ आणि ६६ धावांवर खेळत असताना तिचे दोन सोपे झेल सोडले, जे भारताला अखेर प्रचंड महाग पडले.




