‘मै वापस आऊंगा’ च्या प्रमोशनदरम्यान व्यक्त केले परखड विचार; मानसिक गुलामगिरीचे लक्षण असल्याचे म्हणत दिला ‘मॉडरेट’ राहण्याचा सल्ला
‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘हायवे’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली सध्या त्यांच्या ‘मै वापस आऊंगा’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मात्र, चित्रपटाला मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादादरम्यान, एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी बुरखा आणि पदर (घूंघट) प्रथेबद्दल केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. “जेव्हा एखादी महिला बुरखा किंवा पदरामध्ये स्वतःला सुरक्षित आणि ‘कंफर्टेबल’ (सहज) समजते, तेव्हा ती गोष्ट मला अजिबात पटत नाही,” असे परखड मत इम्तियाज अली यांनी मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप सध्या तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये दोन तट पडले आहेत.
आपली बाजू सविस्तर मांडताना इम्तियाज अली म्हणाले की, “जर एखादी व्यक्ती स्वतःवर लादलेल्या अशा निर्बंधांनाच आपली सोय मानू लागली, तर ते समाजाच्या खालावत चाललेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही मनातून इतके पीडित (Victimised) झाला आहात की, तुम्हाला ते बंधनच आता सामान्य वाटू लागले आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्यांच्या मनात कोणत्याही धर्माबद्दल किंवा समाजाबद्दल आकस नाही. “कोणी काय कपडे घालावेत आणि कसे राहावे, हे सांगणारा मी कोणीही नाही. पण आजकाल समाजात सर्वच गोष्टींमध्ये टोकाची भूमिका (Extreme View) घेतली जाते. संवाद साधणे कठीण झाले आहे, म्हणूनच मी माझे विचार मांडले. मला समाजात पुन्हा एकदा संयम आणि सहनशीलता (Moderation) पाहायची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
फाळणीच्या (Partition) पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या इम्तियाज अली यांच्या ‘मै वापस आऊंगा’ या चित्रपटाला समीक्षकांनी खूप दाद दिली आहे. नसीरुद्दीन शाह, दिलजीत दोसांझ, वेदांग रैना आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या भावनिक चित्रपटाने पहिल्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ₹१४ कोटींची कमाई केली असून, सध्या माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चित्रपट गती पकडत आहे.
दरम्यान, इम्तियाज अली यांच्या या विधानावरून इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी त्यांच्या या विचारांचे स्वागत करत ही पुरोगामी विचारसरणी असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, अनेकांनी यावर आक्षेप घेत, बुरखा किंवा पदर परिधान करणे हा महिलांचा वैयक्तिक अधिकार, पसंती आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे, त्यात कोणत्याही दिग्दर्शकाने ढवळाढवळ करण्याची गरज नाही, अशी टीका केली आहे.




