‘कॉकटेल २’ सोबत दाखवण्यात आलेल्या टीझरने उडवला थरार; प्रसूती कळा सोसत स्टेजवर लावणी सादर करणाऱ्या दृश्याने प्रेक्षक अचंबित
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आगामी ‘ईथा’ (Eetha) या चित्रपटाचे पहिले लुक पोस्टर्स शेअर करताच सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. “तयार हो… येतेय!” अशा हटके कॅप्शनसह प्रसिद्ध झालेल्या या पोस्टर्सना काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका पूर्णपणे वेगळ्या, ऐतिहासिक आणि ग्रामीण ढंगाच्या भूमिकेत दिसणार असून, ती महाराष्ट्राच्या लोककलेतील महान लावणी व तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची जीवनगाथा पडद्यावर साकारत आहे.
विशेष म्हणजे, या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली अधिकृत झलक म्हणजेच टीझर नुकताच चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या ‘कॉकटेल २’ सिनेमासोबत दाखवण्यात आला. हा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे अंगावर काटे आले आहेत. चित्रपट प्रामुख्याने विठाबाई यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द आणि कलेप्रती असलेल्या अथांग प्रेमावर आधारित आहे. टीझरमधील एका अतिशय संवेदनशील आणि अद्भूत दृश्याने प्रेक्षकांना पुरते हलवून सोडले आहे, ज्यामध्ये ९ महिन्यांची गरोदरपणात विठाबाई रंगमंचावर प्रचंड जोशात लावणी सादर करत असताना अचानक त्यांना प्रसूती कळा सुरू होतात.
अशा अत्यंत वेदनादायी आणि कठीण परिस्थितीतही त्या आपली कला अर्धवट न सोडता धैर्याने पडद्यामागे (बॅकस्टेज) जातात, एका बाळाला जन्म देतात आणि एका साध्या दगडाच्या साहाय्याने त्याची नाळ कापून पुन्हा स्टेजवर येऊन आपली अपूर्ण राहिलेली लावणी पूर्ण करतात. विठाबाईंचे हे कलेप्रती असलेले सर्वोच्च समर्पण श्रद्धा कपूरने अत्यंत प्रभावीपणे जिवंत केले आहे. आजवर रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रद्धाने या आव्हानात्मक पात्रासाठी लावणीची देहबोली, हावभाव, ग्रामीण भाषेचा लहेजा आणि रंगमंचावरील आत्मविश्वास आत्मसात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून हा चित्रपट तिच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.




