पुण्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना तपास यंत्रणेच्या कामगिरीचे तसेच सरकारी वकिलांच्या युक्तिवादाचे विशेष कौतुक केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण केला असून, न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावेही भक्कम आणि निर्णायक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात दोषी ठरवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला असून, शिक्षेची अधिकृत घोषणा 29 तारखेला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ठामपणे सांगितले की, अशा प्रकारच्या अमानुष गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि या प्रकरणातही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, हीच आपली स्पष्ट भूमिका आहे. न्यायालयाने सुट्टीच्या काळातही या प्रकरणाची सुनावणी घेतल्यामुळे ही केस भविष्यात जलद न्यायप्रक्रियेचे उदाहरण म्हणून ओळखली जाईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, सामाजिक विश्लेषक केतन अग्रवाल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. समाज म्हणून आपण अशा घटनांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुण पिढीमध्ये सूडभावना किंवा हिंसक प्रवृत्ती का वाढत आहे, याचा सखोल सामाजिक स्तरावर विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.




