चर्चगेट आणि माहिममधील चाकू हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात थरकाप; वाद झाल्यानं पतीनं बॅगेतून काढलं होतं धारदार हत्यार
मुंबईतील रेल्वे स्थानके आणि लोकल गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही दिवसांत अत्यंत गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चगेट-विरार लोकलमध्ये एका २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती, तर माहिम स्थानकाबाहेरही अशीच रक्ताळलेली घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच, आता मुंबईचे मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनबाहेर एका पतीने आपल्या पत्नीवर आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांवर धारदार कोयता उगारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सुदैवाने पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आता हाय अलर्ट मोडवर आले आहेत.
शनिवारी सीएसएमटी स्थानकाबाहेरील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार घडला. आरोपी वकार अन्वर शेख (२२) हा आपल्या पत्नीसोबत मुंबईत फिरायला आला होता. मात्र, तिथं दोघांमध्ये अचानक कडाक्याचे भांडण झाले. या वादाच्या भरात संतापलेल्या वकारने थेट आपल्या पाठीवरील बॅगेतून धारदार कोयता काढला आणि तो आपल्या पत्नीसह आजूबाजूच्या लोकांवर उगारण्यास सुरुवात केली. तो हातात कोयता नाचवत मोठ्याने आरडाओरडा करत लोकांच्या अंगावर धावून जात होता, ज्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. एका सजग नागरिकाने तातडीने ‘X’ (ट्विटर) वर मुंबई पोलिसांना टॅग करत या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संध्या निकम या आपल्या पथकासह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने अत्यंत हुशारीने आरोपीला मागच्या बाजूने घेरले. आरोपीचे लक्ष विचलित होताच महिला अधिकाऱ्याने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झडप घालून वकारच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्याला जमिनीवर पाडले. पोलिसांनी नराधम पतीच्या तावडीतून त्याच्या पत्नीची सुखरूप सुटका केली. आरोपी वकार अन्वर शेख याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे. या धाडसी कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




